top of page
Search

स्थलांतर


स्थलांतर हे पक्ष्यांच्या जीवनातील सर्वात आकर्षक घटनांपैकी एक आहे, कारण अनेक प्रजातीचे पक्षी त्यांच्या स्थलांतरादरम्यान हजारो किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास करतात. या प्रवासांमध्ये अनेकदा समुद्र, वाळवंट, पर्वत, दरी, अश्या असंख्य आव्हानांवर मात करून स्थलांतराचा मार्ग पूर्ण करतात. स्थलांतर म्हणजे फक्त लांबचा प्रवास करणे असे नाही, तर स्थलांतरादरम्यान नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याबद्दल आणि पूर्णपणे अनोळखी प्रदेशांमध्ये जिवंत राहण्याबद्दल जगण्याची तग दर्शिवते. अश्या थकवणाऱ्या प्रवासादरम्यान पक्षांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यात शिकार, बदलते हवामान यांचा समावेश होतो. पण टिकून राहण्याच्या त्याच्या जन्मजात वृत्तीने पक्षी चिकाटीने उडतात आणि एवढा अविश्वसनीय प्रवास पूर्ण करतात.

पण एवढा लांबचा प्रवास हे पिटुकले पक्षी का करतात? मानवाने जेव्हा उत्क्रांतीदरम्यान आफ्रिका खंडातून स्थलांतर केले ते पर्यावरणीय बदलांमुळे. आफ्रिकेच्या जीवघेण्या दुष्काळामुळे मानवावर उपासमारीची वेळ आली आणि जिवंत राहण्याच्या आतंकापोटी मानवाने आफ्रिका खंडातून स्थलांतर केले. जिवंत राहण्याच्या आणि स्वतःचे अस्तित्व टिकविण्याच्या धाडसापोटी मानवाने मोठे स्थलांतर केले. मग अशीच परिस्थिती पाखरांच्या बाबतही आहे का ? सायबेरियाच्या रक्त गोठविणाऱ्या थंडीपासून स्वतःला वाचविण्यासाठी सायबेरियन रुबीथ्रोट नावाचा एक साधारण चिमणीएवढा लहान पक्षी दरवर्षी सायबेरियातून भारतात येतो.   

अश्या हिवाळ्यातील कडाडीची थंडी टाळण्यासाठी असंख्य सायबेरियन पक्षी सायबेरियातील टुंड्रा प्रदेशातून भारतात स्थलांतरीत होतात. पण हे स्थलांतर फक्त थंडी मुळेच होते असे नाही. बर्फ़ाच्छादित प्रदेशात अन्न मिळणे सुद्धा तेवढेच कठीण होऊन जाते जेवढे कठीण अश्या परिस्थितीत प्रजननासाठी साथीदार शोधणे. मग हे पक्षी अन्न शोधण्यासाठी किव्वा प्रजननासाठी लांबचलांब हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. मुळात अश्या हजारो किलोमीटरच्या प्रवासाचे बाळकडू त्यांना घरातच भेटते. त्यांच्या प्रवासाआधी हा प्रवास त्यांच्या पालकांनी पूर्ण केलेला असतो आणि या प्रवासाचा संपूर्ण मार्ग जणू आनुवंशिकतेणे त्यांना उपजत मिळतो. अजूनही आधुनिक विज्ञानाला हे न उलगडलेले कोडे आहे. वर्षानुवर्षे आणि पिढींपिढी हे स्थलांतर ठरलेल्या ऋतूमध्ये आणि ठरलेल्याच मार्गाने अविरत चालू आहे. 

स्थलांतराचे मार्ग हे प्रत्येक पक्षी प्रजातीचे पूर्व-निर्धारित आहे. असे पूर्व-निर्धारित मार्गांवरून असंख्य पक्षी एक संघ होऊन स्थलांतर करतात. या ठरलेले स्थलांतरित मार्ग “फ्लायवे” म्हणून ओळखले जातात, ज्याचा मोठ्या संख्येने जगभर स्थलांतरदरम्यान पक्षांद्वारे उपयोग केला जातो. तर अशे मुख्यतः आठ मार्ग आहे. ज्यातील महत्वाचे तीन मार्ग जसे “मध्य आशियाई फ्लायवे” हा भारत देशाच्या मध्यातून जातो आणि “पूर्व आफ्रिका-पश्चिम आशिया फ्लायवे” आणि “पूर्व आशिया-ऑस्ट्रेलियन फ्लायवे” अशी दोन मार्ग भारतालगतच्या पश्चिम आणि पूर्ण सागरी किनाऱ्याकडून जातात. त्यामुळे बर्‍याच स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींसाठी भारत हा आकर्षणाचा आणि मुक्कामाचा केंद्रबिंदू आहे. उष्णकटिबंध असलेल्या भारतात विविध अधिवास, प्रजनन स्थळ, उबदार हवामान आणि पुरेसे खाद्य चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. ज्याच्या शोधात आशिया खंडांमध्ये लांब आणि कठीण प्रवास करून असंख्य पक्षी पोहचतात. 

भारतामध्ये स्थलांतरित पक्षांमध्ये प्रसिद्ध उदाहरण म्हणजे बार-टेलेड गॉडविट. पक्षी जगातात याच पक्ष्याचे सर्वात जास्त काळ न थांबता स्थलांतर आहे. बार-टेले गॉडविट अलास्कामध्ये प्रजनन करतात आणि नंतर न्यूझीलंडमध्ये उड्डाण करतात आणि एकाच वेळी सुमारे ११,००० किमी अंतर कापतात. ऑक्टोबर २०२२ मध्ये, एका लहानग्या बार-टेल गॉडविट, ज्याला “B6” म्हणून ओळखले जाते त्याने जागतिक विक्रम तोडला. त्या अल्पवयीन पाखराने अलास्का ते ऑस्ट्रेलियाचे अंतर कुठलाही थांबा न घेता पार केले. B६ बार-टेल्ड गॉडविटच्या रंप वर एक साटेलाईट टॅग लावण्यात आला होता, ज्याच्याद्वारे हे निश्चित झाले कि त्या अल्पवयीन पक्षाने, अलास्का ते ऑस्ट्रेलियातील टास्मानियाच्या किनाऱ्यापर्यंत एकूण १३,५६० किलोमीटरचे अविश्वसनीय अंतर ११ दिवस न थांबता उड्डाण करत पार केले. हे अंतर म्हणजे पृथ्वीच्या व्यासाचे एक तृतीयांश अंतर पार करणे आणि तेही हि फक्त अकरा दिवसात*. बार-टेल्ड गॉडविट सारख्या अद्वितीय पक्षाला भारतात पाहायचे असेल तर, हिवाळ्याच्या महिन्यांत जेव्हा ते उत्तर गोलार्धातून स्थलांतर करतात तेव्हा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुराच्या किनाऱ्यावर आणि अंदमान निकोबार बेटांवर आढळून येतात. 

असाच थक्क करणारा प्रवास पूर्ण करणारा आणखी एक स्थलांतरित पक्षी म्हणजे बार-हेडेड गूज, म्हणजेच राजहंस. हा पक्षी त्याच्या आकर्षक रूपासाठीच नाही तर त्याच्या अविश्वसनीय २९,००० फूट उंचीवर उड्डाण करण्यासाठी ओळखला जातो. याचकारणाने राजहंस हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्षांमध्ये गणला जातो. 



अश्या आकर्षक आणि अविश्वसनीय प्रवास करणाऱ्या पक्षाला पाहण्याचा माझा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता. हिवाळ्याच्या हंगामात राजहंस माझ्या मूळ गावी येतात आणि मी त्यांना नेहमीच पाहण्यासाठी उत्सुक असते. वर्धा शहरापासून फक्त ३-४ किलोमीटरवर असणाऱ्या धरणाजवळ त्यांची हालचाल नजरेस येते. मी तिथे पोहोचले तेव्हा, पाण्यालगतच्या शेताच्या कडेला राजहंसाचा मोठा थवा संथपने हालचाल करत होता. ते जमिनीवरच्या छोट्या वनस्पती खात होते आणि फिरताना विशिष्ट हॉर्निंगचा आवाज काढत होते. त्यांच्या विशिष्ट मान, त्याच्या छातीवर पांढरे पंख आणि एक सुंदर राखाडी आणि तपकिरी असलेला पिसारा. त्यांच्या डोक्यावर असलेल्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे त्यांना बार-हेडेड गूज (इंग्र. बार म्हणजे पट्ट्या, हेडेड म्हणजे डोके) हे नाव मिळाले. मी त्यांना आश्चर्याने पाहत असताना, त्यांचे निरीक्षण करत असताना, त्यांनी या ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेल्या प्रवासाबद्दल मला आश्चर्य वाटले. 

राजहंस हे हिमालय ओलांडून हजारो किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी ओळखले जातात. हिमालय ओलांडताना समुद्रसपाटीपासून पाच ते नऊ हजार मीटर दरम्यान ते उड्डाण करतात. म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर उड्डाण करतात. ऑक्सीजनच्या कमतरतेमध्ये अश्या उंचीवर पंखांची फडफड करत उडणे म्हणजे खूप शक्ती खर्च करणे आहे. मग अशा उंचीवर या राजहंसांचे स्थलांतर कसे होऊ शकते? हे एक न उलगडलेले कोडे आहे. एक प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात** याबद्दल सविस्तर लिहिले आहे. राजहंसाचे हिमोग्लोबिन हे इतर पक्ष्यांपेक्षा ऑक्सिजनसाठी जास्त क्षमतेचे असते आणि हायपोक्सिया सारख्या स्थितीत पक्षी इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रमाणात हायपरव्हेंटिलेशन करण्यास सक्षम असतात. म्हणजे रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या कोशींची संख्या तुलनेने जास्त असते त्यामुळे अश्या जीवघेण्या थंडीतही राजहंस तग धरून ठेवतात. याच शोधनिबंधांमध्ये त्यांच्या उडण्याबद्दलचा एक उल्लेख आहे. सरळ उभा असलेला माउंट एव्हरेस्टवर वाहणाऱ्या उभ्या हवेच्या प्रवाहामुळे (ज्याला ली लाट म्हणतात) राजहंसाला उडण्यास मदत होत असावी, तरच ते असे करू शकतात**. अश्या जीवघेण्या वातावरनातुन राजहंस भूप्रदेश पार करतात आणि आपला मार्ग पूर्ण करतात. त्यांची जिद्द, जगण्याची हिम्मत आणि कठोर परीस्थितीत तग धरण्याची कला मानवाला खूप काही शिकवते. 

राजहंसचा प्रवास हा स्थलांतराच्या अविश्वसनीय पराक्रमाचे एक उदाहरण आहे. अश्या स्थलांतराचे प्रवास आव्हानांशिवाय नाहीत. पक्ष्यांना त्यांच्या स्थलांतरादरम्यान अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये निसर्गाच्या कठोर परिस्थिती व्यतिरिक्त मानवी हस्तक्षेप सुद्धा आहे. यामुळे त्यांचा प्रवास अधिकच धोकादायक, जीवघेणा बनतो. पण तरीही आकाराने, वजनानाने लहान असलेले पक्षी त्यांच्या प्रवासाने आपल्याला आश्चर्यचकित करतात. म्हणून, पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही स्थलांतरित पक्ष्यांचा थवा डोक्यावरून उडताना पहाल तेव्हा त्यांच्या प्रवासाचे, त्यांच्या सौंदर्याचे आणि त्यांच्या जगण्याच्या निर्धाराचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ नक्कीच द्या. हा प्रवास साजरा करण्यासारखा आहे.


* Juvenile bar-tailed Godwit ‘B6’ breaks world record; flies 13,560 km non-stop from Alaska to Australia,  TIMESOFINDIA.COM/ TRAVEL NEWS, AUSTRALIA / Created : Jan 7, 2023, 15:09 IST.

**Patrick J. Butler. High fliers: The physiology of bar-headed geese. Comparative Biochemistry and Physiology Part A: Molecular & Integrative Physiology Volume 156, Issue 3, July 2010, Pages 325-329.


83 views0 comments

Comentários


bottom of page